Tuesday, August 31, 2010

Transliteration in Gmail

Transliteration in Gmail तापांच्या साथीच्या विळख्यात पुणे शहर
------------- डॉ. अविनाश भोंडवे
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळ्खले जायचे, ते आज तापांच्या रोगांचे नंदनवन म्हणून गणले जायला हरकत नाही. आज पुण्यामध्ये मागच्या वर्षीचा पाहुणा स्वाइन फ़्लू तर मुक्कामाला आहेच पण त्याच्या सोबतीला डेंग्यू , मलेरिया, विषमज्वर, चिकुनगुन्या, न्यूमोनिया हे जुने स्नेही देखील आवर्जून आले आहेत. सर्व पुणेकरांचा या तापांच्या साथींनी कबजा तर घेतला आहेच, पण सर्व रुग्णालये ठसाठस भरून ओसंडतायत , दवाखाने रात्री उशीरापर्यन्त आटोपत नाहियेत, औषधान्च्या दुकानान्समोर एखाद्या हाउसफ़ुल चित्रपटगृहासारखी गर्दी असते.
हे सर्व होत असताना, हे ताप टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, हे समजून घेणे हा एक लेखाचा उद्देश नाही, कारण तो एखाद्या ग्रन्थाचा विषय होईल. प्राप्त परिस्थितीत या तापदायक आजारांची थोडी माहिती करून योग्य वेळी काय केले पाहिजे, हे समजून घेऊ या.
आजारांचे प्रकार
या आजारान्चे लक्षणान्प्रमाणे दोन प्रकार पाडता येतील,
१) सर्दी, खोकला आणि ताप असणे
२) सर्दी, खोकला नाही पण ताप असणे

पहिल्या प्रकारात मुख्यत्वे, साधा फ़्लू आणि स्वाइन फ़्लू येतात. या दोन्ही आजारात कडक ताप आणि सर्दी, घसा दुखणे, खोकला असणे असते. पण साध्या फ़्लूमध्ये तापाचा उतार चढाव दिवसभरात दोन तीन वेळा होतो, पण स्वाइन फ़्लू मध्ये ताप उतरतच नाही. त्यामुळे ज्या रुग्णाला वरील लक्षणे आहेत पण पहिल्या दोन दिवसात ताप अजिबात देखील उतरत नाही, अशा रुग्णाने महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन त्वरित स्वाइन फ़्लू च्या गोळ्या अथवा औषध सुरू करावे. हे औषध स्वाइन फ़्लूची कुठ्लीही तपासणी न करता घ्यावे.त्याबरोबर इतर तपसण्या नन्तर करून, एखादा अन्य आजार निघाल्यास त्याची उपाय योजना देखील एकत्रितपणे सुरू ठेवावी. लक्षात ठेवा, स्वाइन फ़्लूची औषधे तो आजार नसताना घेतल्यास कु्ठलाही धोका नसतो, पण ती घेणे टाळल्यास किंवा एकदा सुरू केल्यावर बन्द केल्यास, तुम्ही मोठ्या आजाराला निमन्त्रण देता.
स्वाइन फ़्लूची औषधे खाजगी दुकानात देखील मिळतात, पण ती तशी महागही पडतात आणि महापालिकेच्या दवाखान्यात ती विनासायास मिळतात. जर तुम्ही तुमच्या वैद्यकीय सल्लागाराची चिठ्ठी घेऊन गेलात तर तुम्हाला थोडे देखील कष्ट पडणार नाहीत.
स्वाइन फ़्लू असा ताब्यात आल्यावर साधा फ़्लू असेल तर तो वैद्यकीय सल्लागाराच्या साध्या औषधानी बरा होणारच! आणि मग जर या प्रकारातले इतर आजार असतील तर ते थोड्या अधिक तपासण्या आणि काही उत्तम औषधे वापरून तुमचे डॉक्टर तुम्हाला बरे निश्चितच करतील.
दुसरा प्रकार म्हणजे रुग्णाला सर्दी, खोकला नसतो पण खूप ताप असतो. डेन्ग्यू, मलेरिया, विषमज्वर, चिकुनगुन्या हे आजार या प्रकारात येतात. या पैकी मलेरियामध्ये थन्डी भरून येते, ही थन्डी कधी कधी एवढी जोरदार असते की दोन चार जाड चादरी पान्घरल्या तरी कमी होत नाही. मात्र आज काल बऱ्याचदा मलेरियामध्ये रोज सन्ध्याकाळी थोडीशी हुडहुडी भरून येते आणि मग ताप येतो. दिवसा मग ताप अजिबात नसतो.मलेरियाच्या तापाचे निदान रक्ताच्या तपासणी मध्ये निश्चित करता येते. त्यात मलेरिया्च्या दोन पैकी कुठला प्रकार आहे ते ठरवून औषधोपचाराद्वारे तो नक्की बरा करता येतो.
डेन्ग्यूच्या तापामध्ये ताप, थोडी थन्डी येते पण अन्ग आणि हातपाय भयन्कर दुखतात. अन्गावर एक प्रकारची बारीक, लाल पण न खाजणारी पुरळ येते. य़ा वेळी त्वरित रक्त तपासणी केली तर रक्तातल्या छोट्या लाल पेशी ( प्लेटलेट्स ) खूप कमी झालेल्या दिसतात, तशीच डेन्ग्यूच्य खात्रीसाठी एक खास तपासणी, आय जी जी आणि आय जी एम ही देखील करून निदान पक्के करता येते. या तपासणीत जर या छोट्या लाल पेशी थोड्याशाच कमी असतील तर काळजीचे कारण नसते. दररोज त्या पेशीन्च्या सन्ख्येवर रक्त तपासणी करून लक्श ठेवावे लागते. जर त्या पेशी ५०,००० हून कमी झाल्यातर रुग्णाला इस्पितळात हलवावे लागते. दरम्यान रुग्णाला नाका-तोन्डातून, शौचातून अथवा लघवीवाटे रक्तस्त्राव व्हायला लागला तर आय सी यू मध्ये ठेवावे लागते. सुदैवाने सध्या अशा प्रकारच्या डेन्ग्यूचे रुग्ण कमी आहेत.
चिकुनगुन्या नावाच्या एका विचित्र आजाराने आज अनेक जण पीडित आहेत. या आजारामध्ये ताप तर येतोच पण गुडघे, घोटे, मनगटे असे मुख्य सान्धे प्रचन्ड दुखतात. हे दुखणे कधी कधी एवढे जबरदस्त असते की रुग्ण जागेवरून उठू शकत नाहीत, चालण-फिरण तर दूरच राहत. या आजारात ताप उतरल्यावर देखील काही महिने या वेदना होउन माणस बिछान्याला खिळून राह्तात. या आजाराची देखील आय जी जी चिकुनगुन्या ही एक खास तपासणीकरून निदान पक्के करता येते.
डेन्ग्यू, मलेरिया, आणि चिकुनगुन्या हे तिन्ही आजार डासान्मुळे होतात, पण त्या त्या आजारान्च्या डासान्च्या जाती वेगवेगळ्या आहेत. मलेरियाचा डास हा डबक्यान्मध्ये वाढतो, तर डेन्ग्यूचा डास छोटे खाच खळगे, निकामी टायर अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात त्याची पैदास करतो. उलटपक्शी चिकुनगुन्याचा डास मात्र साचलेल्या स्वच्छ पाण्यात म्हणजे झाडान्च्या कुन्ड्या, बागेतील पाणी, गवतावर साचलेले पाणी यात जोम धरतो. त्यामुळे यावर्षी झोपडपट्टयात आणि दाट वस्त्यन्मध्ये डेन्ग्यू आणि मलेरिया, तर उच्चभ्रू भागन्मध्ये चिकुनगुन्याची लागण जास्त असे चित्र दिसत आहे.एकूणच या साथीन्ची खरी कारण, शासकीय आणि महापालिकेच्या अयोग्य व अपुरी आरोग्य व्यवस्था हेच आहे.
विषमज्वर किंवा टायफोईड हा आजार तसा आता वर्षभर सापडत असतो, पण सध्या या तापच्या रुग्णान्च्या संख्येत बरीच वाढ झालेली दिसून येत आहे. हा आजार आतड्यान्चा असतो आणि दूषित अन्न, उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. या आजाराचे निदान रक्त तपासूनच होते, पण ते तापाच्या पाचव्या दिवशी तपासावे लागते. या आजारात ताप थोडा थोडा रोज वाढत जातो आणि नेहमी सुरवातीला दुर्लक्श होते व नन्तर आजार विकोपाला गेल्यावर रुग्ण डॉक्टरांकडे जातो. या आजाराची प्रभावी लस उपलब्ध असूनही फार थोडे नागरिक ती घेण्याबद्दल जागरूक दिसतात.
सारान्श असा की हे सर्व आजार जाणून घेऊन सर्व नागरिकानी कुठलाही ताप असला तरी सध्या घरगुती उपचार न करता योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पुणे शहराचा हा रोगप्रवण पणा हा काळजीचा विषय जरूर आहे; सरकारने आपल्या सर्वान्च्या आरोग्याची जपणूक जरूर केली पहिजे; हे होईल तेंव्हा होईल; पण तो पर्यन्त तुमची काळजी तुम्हीच घ्यायला हवी!
--------